शेवटचं पान
संध्याकाळ. तो आज नेहमीच्याच वेळी घरी आला. घर....खोली म्हणा हवं तर....बऱ्यापैकी अंधार झाला होता बाहेर.
आत आल्यावर नेहमीप्रमाणे त्यानं त्याचं खांद्यावरचं ओझं फेकून दिलं. ती खोली आजही नेहमीप्रमाणे विस्कटलेली होती. अस्ताव्यस्त. अस्ताव्यस्त असली तरी गरजेच्या गोष्टी त्याला पटकन सापडायच्या त्या पसाऱ्यात. तसही तो एकटाच असल्यानं त्याचं असं काही फारसं सामान नव्हतं तिथं. झोपायला गादी, त्यावर विस्कटलेले कपडे, बारीकसारीक समान असच पसरलेलं, बिअर च्या रिकाम्या बाटल्या, पिझ्झा चे बॉक्स, सिगरेट ची थोटकी.
एक टेबल होतं तिथं....त्यावर एक डायरी...त्याची...तो लिहायचा त्यात रोज...ती जागा मात्र नीट असायची....
त्याची डायरी....
रात्रीची सिगरेट पिऊन झाली की तो लिहायला बसायचा त्या डायरीत.....त्या एकटेपणात ती डायरी त्याची साथ द्यायची. एकटेपण बोलायचं त्याच्या बरोबर त्या वेळी.
आजही तो रात्री नेहमीसारखाच आला होता. म्हणजे कित्येक दिवस तो तसाच येतो. व्यक्त न होणारा चेहरा घेऊन. आजही नेहमीप्रमाणे तो त्या पसाऱ्यात पहुडला. छताकडे बघत...निपचिप...आज नेहमीपेक्षा जास्त आवाज करणारी शांतता त्या खोलीत....
तो जागा झाला. सिगरेट शिलगावली. त्या धुरात तो धूसर होत गेला. आज त्याचं मन नव्हतं कदाचित कशातच. निम्मिच सिगरेट प्यायला तो. सिगरेट न धूर ओकण बंद केलं. तसाच तो त्या टेबल पाशी आला. ती डायरी हातात घेतली. त्यानं लिहायला सुरवात केली.
"आज 31 डिसेंबर. दररोज दिवस ढकलायचो. आजही ढकलला. म्हणजे ढकलतोय अजून. पण आजचा दिवस वेगळा आहे आज दिवस नाही तर अक्ख वर्ष ढकलणार पुढं. असो खराब विनोद होता...पण "आज वर्षाचा शेवटचा दिवस.त्या मुळे वर्षा खुश आहे..." या विनोदापेक्षा नक्कीच चांगला होता. आज काय नवीन लिहायचं ना. नेहमी पडणारा प्रश्न आजही आहे पण आजच मी सगळं संपवून टाकणार आहे. मनातलं. साचलेलं. तसं मला कधी डायरी लिहायला आवडायचं नाही. लहान असताना तसा डायरी वैगरे लिहायचा प्रयत्न केला होता मी शाळेत वैगरे सांगतात म्हणून. पण ते काय शेवटपर्यंत जमायचं नाही. मोठा होत गेलं तसं डायरी वैगरे लिहिणं हे फालतू वाटायचं. डायरी लिहणारी लोकं आपला भूतकाळ का मांडून ठेवत असतील असा प्रश्न पडायचा नेहमी. असे भूतकाळ वैगरे शब्द पचनी नाही पडायचे पूर्वी. पण जेंव्हा मी माझ्या डायरीच्या या 31 डिसेंबर या पानावर आलो तेंव्हा समजून गेलं हे भूतकाळ वैगरे. वाटलं होतं आज मागची पानं उलगडावी. पाहावं काय घडलंय आपल्या आयुष्यात. त्याच वेळी नको ही वाटतं. पानं उलगडली तरी काही बदलणार थोडी आहे. वाटतं अनेकदा आपणच चुकलोय. सारखं परिस्थितीला दोष देऊन कसं चालेल? आपणही काही वेळा अवलंबून असतो त्या परिस्थितीसाठी. असं समजत असूनही "मीच का?" किंवा "माझ्याबरोबरच असं का?" असं म्हणत नशिबाला दोष दिला कायम. मी कधीच डायरीत लिहताना दिवस भरात काय घडलं अश्या गोष्टी कधीच लिहिल्या नाहीत. मी लिहीत गेलोय तो मीच माझ्याशी केलेला संवाद. ती स्वतःबरोबर केलेली भांडणं. नंतर स्वतःच स्वतःची काढलेली समजूत. आणि नेहमी माझी होणारी हार. स्वतःशी होणारी हार.
आज ठरवलंय सगळं सारांश मांडायचा आणि संपवायचं सगळं. हे डायरी लिहिणं वैगरे. बस झालं होतं स्वतःशीच बोलणं. एकटं राहायचा आता कंटाळा आलाय. खरंच. सोबत असणारी शांतता ही अनेकदा साथ सोडून जाते. तेंव्हा तर नको नको होतो जीव. बाहेर गेलं की कोंडल्यासारखं वाटतं. ती माणसं. रोजचा तो बसचा प्रवास. कलकलाट. गोंगाट. कानावर हात ठेवला तरी घुमत राहणारा तो आवाज. नको झालंय सगळं. हे सगळं माझ्या एकटेपणामुळं होतंय का? की तसाच आहे मी. मला माहिते तसा नव्हतो मी. अजिबात नव्हतो. ही मागची पानं उलगडली तर नक्की कळेल मी कसा होतो आणि काय झालंय आत्ता मला.
लोकं डायरीत दिवसाचा भूतकाळ लिहतात. वाचतात. आणि खुश होतात. माझ्या ह्या डायरीत चेहऱ्यावर हसू येईल असं काहीच नव्हतं. अनेकदा वाटतं वाचावं पुन्हा. पण नाही वाचू शकलो मी पुन्हा. काय वाचू तरी काय. दुःख. एकटेपण. हे इतकंच. हे वाचून काय मिळणार. अजून दुःख. निराशा. हताश होणं. कशाला ना त्या पेक्षा नं वाचलेलंच बरं असं म्हणत मी दरवेळी टाळलं. बरं केलं नाही मी. तसही तो भूतकाळ वाचून थोडी आजच किंवा उद्याच जगणं बदलणार होतं.
नवीन असलं म्हणून काय मी उद्याचा दिवस जगणार थोडीच आहे. मला माहिते हे एकटेपण मला संपवणार आहे. ते कधीच साथ नाही सोडत माझी. मी कुठं मिसळायला लागलो की ते दिसायचं मला समोर... घेऊन जायचं मला त्याच्याबरोबर. आज मात्र मी ठरवलंय संपवायचं या एकटेपणाला. संपवतोच. राग आलाय त्याचा."
डायरीची पानं संपली. तो उठला. तिथलीच एक बिअर ची बाटली त्यानं फोडली. काचेचा एक तुकडा घेतला. हातावरून फिरवला. आक्रोश. त्या टेबल समोरच्या खुर्चीत येऊन बसला. तोच तुकडा त्यानं दुसऱ्या हातावरून फिरवला. रक्त पसरत होतं. जीव घेतला एकटेपणानं त्याचा.
...त्या डायरीत पेन तसंच होत. पंख्याच्या वाऱ्याने डायरीची पानं उलगडत चालली होती. त्यातली अनेक पानं तशीच कोरी होती आणि काहींवर नुसता गिरगोटा...
©gsumitt
Comments
Post a Comment